Chandrapur : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे वैद्यकीय पात्रता आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना रुग्णालय चालवून रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी कथित बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई केली आहे.विश्वजीत रमाकांत बिश्वास (वय 38, रा. चंदनखेडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सोमवारी (दि.19 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संबंधित रुग्णालयातून औषधसाठा आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
'6 ते 7 वर्षांपासून रुग्णालय चालविल्याचा आरोप' :
प्राप्त माहितीनुसार,विश्वजीत बिश्वास हा कोणतेही वैध वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना मागील 6 ते 7 वर्षांपासून चंदनखेडा येथे रुग्णालय चालवून रुग्णांवर उपचार करीत असल्याचा आरोप आहे.वैद्यकीय पात्रता नसतानाही आर्थिक लाभासाठी रुग्णांवर उपचार केले जात असल्याची बाब समोर आली आहे.
'प्रशासनाच्या निर्देशानंतर पोलिसांची धाड' :
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय आनुटकर यांना संबंधित व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते.तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार डॉ.संजय आनुटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रावती पोलिसांनी चंदनखेडा येथील संबंधित रुग्णालयात धाड टाकली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी करून तेथील औषधसाठा व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर विश्वजीत बिश्वास याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.या कारवाईमुळे चंदनखेडा परिसरात खळबळ उडाली असून,वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
#Fake doctor arrested Case #Fake doctor arrested in Chandankheda #Chandrapur Crime News.

