Cattle Smuggling : गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार, २८ जनावरांची सुटका; २१.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त!| Marathi News.

 News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात पडोली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या नाकाबंदीला न जुमानता भरधाव वेगाने वाहन पळविणाऱ्या चालकाचा पोलिसांनी पाठलाग केला.अखेर वरोडा गावाजवळ रस्त्यावर अडथळा निर्माण करून आयशर वाहन थांबविण्यात पोलिसांना यश आले.वाहनाची तपासणी केली असता,त्यामध्ये अमानुषपणे कोंबून ठेवलेली २८ गोवंशीय जनावरे आढळून आली.या कारवाईत जनावरांसह आयशर वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

'नाकाबंदी पाहताच चालकाने पळविले वाहन.'

पडोली पोलीस ठाण्याचे पथक पडोली चौकासमोर नाकाबंदी करीत असताना,पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लाल रंगाचे आणि निळ्या ताडपत्रीने झाकलेले सहाचाकी आयशर वाहन (क्रमांक MH-28-BB-4970),चंद्रपूरकडून इरई नदी मार्गाने येताना दिसले.

पोलिसांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा करून वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले.मात्र,चालकाने वाहन पेट्रोल पंपाच्या आवारात वळवून यू-टर्न घेतला आणि राँग साईडने अतिवेगाने पळ काढला.त्यामुळे पोलिसांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला.

'वरोडा गावाजवळ पोलिसांनी रोखले वाहन.'

पोलिसांच्या पाठलागादरम्यान आयशर वाहन कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि पुढे राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा गावाच्या दिशेने जात होते.पोलिसांनीही पाठलाग सुरू ठेवत वरोडा गावातील रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाहन थांबविले.

वाहन थांबताच चालकाने वाहन जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र,सतर्क पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला आणि गावालगतच्या शेतशिवारातून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बैल आणि गायी अशी एकूण २८ गोवंशीय जनावरे अमानुषपणे कोंबून भरलेली आढळली.

'२१ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त.'

१) २८ जिवंत गोवंशीय जनावरे — अंदाजे किंमत १ लाख ८३ हजार रुपये.

२) आयशर वाहन (क्रमांक MH-28-BB-4970) — अंदाजे किंमत २० लाख रुपये.

३) विवो कंपनीचा मोबाईल फोन — अंदाजे किंमत १० हजार रुपये.

अशा प्रकारे एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

'वाहनचालकाला अटक; पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.'

या प्रकरणी अब्दुल हफिज गुफ्रान खान (वय ३३ वर्षे,रा.वार्ड क्र.४, कुरेशी मोहल्ला,गडचांदूर),याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात अप.क्र.३१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५(१),५(ब),९ व ११,प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड),तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३२,१७९ व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.'

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे,पोलीस हवालदार विनोद वानकर,धीरजकुमार लोधी,पोलीस अंमलदार समीर खाडे,श्रीनिवास वाभीटकर आणि धीरज भोयर यांनी सहभाग घेतला.पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

#Chandrapur District Crime News #Cattle Smuggling Case.

                         ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢