Gadchandur Crime News : महिलेच्या घरातून ₹४२,३०० किमतीचा ८४६ ग्रॅम गांजा जप्त; गडचांदूर पोलिसांची भंडारा कॉलनीत धडक कारवाई!|Marathi News.

News@Ganja Seized...

               Gadchandur : कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील भंडारी कॉलनी,वॉर्ड क्रमांक ४ परिसरात गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या एका महिलेच्या घरावर गडचांदूर पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी ८४६ ग्रॅम गांजा अंदाजे ४२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राजेंद्र अनभुले यांना भंडारी कॉलनी परिसरातील संबंधित महिला स्वतःच्या घरात गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.माहितीची खात्री झाल्यानंतर ठाणे दैनंदिनीत नोंद घेऊन पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी अहवाल सादर करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दोन शासकीय पंच,वजनमाप तज्ज्ञ आणि छायाचित्रकार यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या उपस्थितीत महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने भंडारी कॉलनीतील संबंधित घराची घेराबंदी केली.

घटनास्थळी संशयित महिलेला एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० अन्वये झडतीबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आली.त्यानंतर पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता बेडरूममधील पलंगाखाली एका पांढऱ्या पिशवीत लपवून ठेवलेला गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला.

वजनमाप तज्ज्ञांकडून इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी केली असता पांढऱ्या पिशवीत हिरवट रंगाची पाने,फुले व बोंडे असलेला एकूण ८४६ ग्रॅम वजनाचा गांजा,अंदाजे ₹४२,३०० किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रासायनिक विश्लेषणासाठी २४-२४ ग्रॅमचे दोन स्वतंत्र नमुने सीलबंद करण्यात आले.उर्वरित ७९६ ग्रॅम गांजा पंचांसमक्ष सील करून जप्त करून आरोपी महिले विरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

  सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आली.महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

#Gadchandur Crime News #Ganja Seized #Action by Gadchandur Police.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢