DJ Dolby ban : डीजेचा दणदणाट पडला महागात; राजुरा पोलिसांची धडक कारवाई, ₹१२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !|Marathi News.

News@Crime...

            Rajura : शासकीय आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना डीजे व साऊंड सिस्टीम वाजविण्याच्या तयारीत असलेल्या दोघांवर राजुरा पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत डीजे साहित्य,जनरेटरसह महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ₹१२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि.१४ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सपोनि. लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता,महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH-34-BZ-5017 वर डीजे वाजविण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले.

   पोलिसांनी वाहनचालक व मालकाकडे डीजे/वाद्य वाजविण्या बाबत अधिकृत परवान्याची विचारणा केली.मात्र,त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे व साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डीजे साहित्य व वाहन ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलीस ठाणे राजुरा येथे अप.क्र.७३०/२०२६ अन्वये कलम २२३ भारतीय न्याय संहिता (BNS),२०२३ सह कलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा,१९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी :

१. रवि सतीश एकनकर (वय २८)

व्यवसाय : डीजे मालक/ऑपरेटर

रा. फुलसिंग नाईक वॉर्ड,बल्लारपूर.

२. सचिन इन्चुलाल सरोज (वय २२)

व्यवसाय : चालक

रा.पंडित दीनदयाल वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर.

जप्त मुद्देमाल :

पोलिसांनी केलेल्या कारवाईत डीजे साऊंड सिस्टीम,जनरेटर, मिक्सर तसेच बोलेरो पिकअप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार,एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१२.६० लाख आहे.

पथकाची कारवाई :

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

गुन्हे शोध पथकाचे सपोनि.लक्ष्मण लोकरे,सफौ.किशोर तुमराम, पोहवा.विक्की निर्वाण,पोहवा.अनुप डांगे,पोअं. शफीक शेख, मिलिंद जांभुळे,रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा राजुरा पोलिसांनी दिला आहे.

#DJ Dolby ban #Rajura Police Action #Crime News

                      ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢