Crime News : जादूटोण्याच्या संशयातून सुनेची कुऱ्हाडीने हत्या; सासऱ्याची विहिरीत उडी!|Marathi News.

News@Shocking...

Nagpur Crime : मुलाच्या मृत्यूला आपल्या सूचनेचा जादूटोणा कारणीभूत असल्याचा संशय मनात बाळगून सासऱ्याने सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली.हत्येनंतर आरोपी सासऱ्याने जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.नागरिकांनी त्याला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊट येथे घडली.लक्ष्मी रविशंकर पाली (वय ४२),असे मृत महिलेचे नाव असून,नथुलाल भगवान पाली (वय ७०),असे संशयित सासऱ्याचे नाव आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर सुनेवर जादूटोण्याचा संशय :

लक्ष्मी यांच्या पतीचे २०१९ मध्ये निधन झाले होते.त्यानंतर नथुलाल यांच्या मनात मुलाच्या मृत्यूबाबत सुनेविषयी संशय निर्माण झाला होता.लक्ष्मी यांनी मुलावर जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय नथुलाल घेत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

याच कारणावरून सासरा आणि सुनेमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याची माहिती आहे.दरम्यान,दोघांमध्ये पुन्हा याच मुद्द्या वरून वाद झाला.वाद विकोपाला गेल्यानंतर नथुलाल यांनी घरातील कुऱ्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यावर वार केला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे कळते.

हत्या केल्यानंतर विहिरीत उडी :

सुनेची हत्या केल्यानंतर नथुलाल यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.नागरिकांनी नथुलाल यांना विहिरीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल केले.त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यशोधरानगर पोलिसांकडून तपास सुरू :

घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.घटनेमागील नेमका वाद,हल्ल्याची परिस्थिती तसेच आरोपीच्या मानसिक अवस्थेसह सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या संशयातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

#Shocking News #Nagpur Crime News.

                             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢