देहू : आर्थिक विवंचनेमुळे आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याचे सांगत एका दाम्पत्याने तिला देहूजवळील भंडारा डोंगरावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कोणीतरी दानशूर व्यक्ती किंवा चांगले कुटुंब या मुलीला घेऊन तिचा सांभाळ करेल,या भावनेतून मुलीला तेथे सोडल्याचे संबंधित आई-वडिलांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अजय यादव (वय २३)आणि खुशबू अजय यादव (वय २२,दोघेही रा.वासुली, मूळ उत्तर प्रदेश),यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यादव दाम्पत्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असून,पती कामगार आहे,तर पत्नी गृहिणी आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने मुलीला दारिद्र्याचे चटके बसू नयेत,या विचारातून रविवारी (६ सप्टेंबर) त्यांनी चिमुकलीला भंडारा डोंगरावर एकटे सोडल्याचे समोर आले आहे.
मुलगी आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डॉ. प्रकाश कोयाडे यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
दरम्यान,सोमवारी सायंकाळी पश्चात्ताप झाल्यानंतर संबंधित आई-वडील स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले.सुरुवातीला मुलगी मुंबई येथे सापडल्याचा दावा त्यांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मात्र,चौकशीदरम्यान त्यांनी मुलीला भंडारा डोंगरावर सोडल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिमुकलीची देखभाल करणाऱ्या महिला पोलिसालाही अश्रू अनावर :
सध्या मुलीच्या देखभालीसाठी रुग्णालयात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.पत्रकारांनी या चिमुकलीबाबत विचारणा केली असता महिला पोलिस कर्मचाऱ्यालाही अश्रू अनावर झाले. ‘कोणी आपल्या मुलासोबत असे कसे वागू शकते?’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास :
भंडारा डोंगरावर सोडलेल्या मुलीचे आई-वडील पोलिस ठाण्यात हजर झाले असून,आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने तिला सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र,या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
सध्या चिमुकली वायसीएम रुग्णालयात सुरक्षित असून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.वैद्यकीय तपासणी आणि डीएनए तपासणीनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिची बालगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान,या प्रकरणामागील नेमकी परिस्थिती,दाम्पत्याचा दावा आणि मुलीला डोंगरावर सोडण्यामागील इतर कारणे याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
#Shocking News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
