News@Crime...
Gadchandur : सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातील 20 टक्के रकमेची मागणी करून,ती न दिल्यास करार रद्द करून न्यायालयातून स्थगिती मिळवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करत आदिवासी शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी नंतर 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात अंदाजे 82 लाख 66 हजार रुपये घेतल्याचा आरोप असून,कोरपना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर गडचांदूर पोलीस ठाण्यात फसवणूक व खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.भारत कवडुजी आत्राम (रा.बिबी नांदाफाटा,ता.कोरपना)आणि आनंदराव मारोती मेश्राम (रा.हिरापूर,ता.राजुरा),अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की,वरोरा येथील सेवानिवृत्त तलाठी तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद कवडुजी खोब्रागडे,हे 2021 मध्ये जिवती येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना, माणिकगड सिमेंट कंपनी गडचांदूरकडून जिवती तालुक्यातील मौजा कुसुंबी येथील 24 आदिवासींच्या 63.62 हेक्टर क्षेत्रातील जमिनीचा वापर चुनखडी उत्खननासाठी होत असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा करण्यात आला होता.या प्रकरणी खोब्रागडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. संबंधित आदिवासींनीही या प्रकरणात प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भारत आत्राम आणि आनंदराव मेश्राम यांनी सिमेंट कंपनीकडून अधिक मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधित आदिवासी शेतकऱ्यां सोबत समझोता करार करून घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार,कंपनीकडून संबंधित आदिवासींच्या स्टेट बँक ऑफ इंडिया,आवाळपूर शाखेतील खात्यांमध्ये जमिनीच्या मोबदल्याची रक्कम जमा करण्यात आली.त्यानंतर या दोन्ही व्यक्तींनी मिळालेल्या रकमेपैकी 20 टक्के रकमेची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.मागणी केलेली रक्कम न दिल्यास कंपनीकडील करार रद्द करण्यासाठी प्रयत्न करू तसेच न्यायालयातून स्थगिती मिळवून देऊ,अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकारामुळे संबंधित आदिवासी शेतकऱ्यांनी विविध टप्प्यांवर आपल्या बँक खात्यांतून रक्कम काढून संबंधित व्यक्तींना दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तसेच शासनाकडून न्यायालयीन कामासाठी मिळालेल्या प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या रकमेतूनही पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.1ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत दोन्ही व्यक्तींनी मिळून अंदाजे 82 लाख 66 हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणात सारजाबाई कोटनाके, निळकंठ आत्राम,आयु सिडाम,बापुराव जुमनाके,वासुदेव जुमनाके किसन जाधव,नामदेव जाधव,रामू सिडाम,हिरामण उदे यांच्यासह इतर बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी तक्रारीत आपली बाजू मांडल्याची माहिती आहे.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा दावा करत सेवानिवृत्त तलाठी विनोद खोब्रागडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)कलम 175(3)अंतर्गत कोरपना येथील न्यायालयात अर्ज केला.न्यायालयासमोर संबंधित कागदपत्रे व पीडितांच्या प्रतिज्ञापत्रांसह विविध पुरावे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर कोरपना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या आदेशानंतर गडचांदूर पोलीस ठाण्यात भारत कवडुजी आत्राम आणि आनंदराव मारोती मेश्राम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS)2023 मधील कलम 308(2),318(2),318 (4)आणि 3(5)अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गडचांदूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अनभुले,हे करीत असून प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Gadchandur Crime #Tribal Extortion Case #Crime News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
