Jan Aakrosh Morcha Rajura : जनतेच्या प्रश्नांवर कॉंग्रेसचा एल्गार; राजुऱ्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा.|Marathi News.

News@Morcha...

      Rajura : शेतकरी,शेतमजूर,महिला,युवक,विद्यार्थी,बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी राजुरा येथे भाजप सरकारविरोधात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला सुमारे पाच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली.विविध मागण्यांचे फलक हातात घेत आंदोलकांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे कूच केली.तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल,राष्ट्रपती आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि जाहीर सभा घेण्यात आली.

 'काय होत्या मागण्या....' :

काँग्रेसच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफी,राज्यात दुष्काळ जाहीर करणे,शेतमालाला कायदेशीर हमीभाव,खते-बियाण्यांचा काळाबाजार रोखणे,जिवतीतील सातबारा व फार्मर आयडीचे प्रश्न सोडवणे,तसेच राजुरा,कोरपना,जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देणे,लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू करणे,वगळलेल्या महिलांना न्याय देणे, नवीन नोंदणी सुरू करणे,NCMC कार्डची सक्ती थांबवणे, निराधारांना नियमित आर्थिक मदत,स्मार्ट मीटरचा अतिरिक्त आर्थिक भार थांबवणे,खराब रस्त्यांची दुरुस्ती,घरकुल व सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रलंबित लाभ,पेपरफुटीला आळा आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार,महागाई कमी करणे,गॅस-पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देणे,E 20 पेट्रोल बंद करणे,OBC समाजाची जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र नोंद करणे तसेच OBC,SC व ST समाजाचा निधी अन्य कामांसाठी वळवू नये,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करू : माजी आमदार सुभाष धोटे.

माजी आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.जिवती येथील सातबारा व फार्मर आयडी,शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी पट्टे,अखंडित वीजपुरवठा,लाडकी बहीण योजनेतील महिलांचे प्रश्न,रस्ते,घरकुल आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न तातडीने सोडविले पाहिजेत,असे त्यांनी सांगितले.

पेपरफुटीला आळा घालण्यासह मतचोरीच्या आरोपांची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.शासनाने जनतेच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास काँग्रेसचा लढा अधिक तीव्र केला जाईल,असा इशारा धोटे यांनी दिला.

'जनतेच्या हक्कासाठी काँग्रेसचा आवाज कायम' : खासदार प्रतिभाताई धानोरकर.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिक विविध प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने एकत्र येत जनआक्रोश व्यक्त केल्याचे सांगितले.पीक नुकसान भरपाई, कर्जमाफी,लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित प्रश्न,रोजगार,रस्ते, घरकुल आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न तातडीने मार्गी लागले पाहिजेत,असे त्यांनी नमूद केले.

स्मार्ट मीटर आणि सोलर पंपाची सक्ती बंद झाली पाहिजे. जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील, असे प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हणमंत पवार यांनीही सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी,महिला,युवक व सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांना सामोरे जात असल्याचे सांगत शासनाने जनतेच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

मोर्चात राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे,विजय बावणे,शंतनू धोटे,ॲड.कुंदा जेनेकर,विनोद दत्तात्रय,प्रमोद बोरीकर,दीपक वाढई,हरजीत सिंग संधू,अलका वाढई,दीप्ती सोनटक्के,राजू रेड्डी,संजय मेंढी,देवेंद्र आर्या,अशोक बावणे,तिरुपती इंदूरवार,उत्तमराव पेचे,रंजन लांडे,डॉ.अंकुश गोतावळे,अशोक रेचनकर,गोविंदा उपरे,अब्दुल करीम,निर्मला कुळमेथे,सोनू दिवसे,आशा खासरे,सपना मोरे यांच्यासह शेतकरी, महिला,युवक,विद्यार्थी,कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले.

#Jan Aakrosh Morcha Rajura. #Chandrapur. #Former MLA Subhash Dhote. #MP Pratibha Dhanorkar.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢