Chandrapur District Crime : राजुरातील गोळीबार हत्याकांडाला मोक्काचा दणका!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून करण्यात आलेल्या खळबळजनक हत्याकांडाची राजुरा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून,या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा,१९९९ (MCOCA)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदाच मोक्का कायद्याचा वापर करण्यात आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नारळ पाण्याच्या दुकानाजवळ गोळीबार :

दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यान सोमनाथपूर वार्ड,राजुरा येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे कोर्टासमोरील किरणकुमार साईला यांच्या नारळ पाण्याच्या दुकानाजवळ मित्रांसोबत बसले होते.

यावेळी इंदिरानगर,राजुरा येथील आरोपी करण दुर्गराज मेकलवार आणि करण दीपक बावीस्कर हे तोंडाला दुपट्टा बांधून दुचाकीवरून तेथे आले.यातील करण दीपक बावीस्कर याने जवळील पिस्तुलातून विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर गोळीबार केला.या हल्ल्यात जाधव यांची हत्या झाली.

या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप.क्र.६९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS)कलम १०३(१),३(५)तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३,२५,२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात कट रचणाऱ्यांसह पाच जणांवर कारवाई‌ :

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली वेगाने करण्यात आला.तपासादरम्यान प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींसोबतच गुन्ह्याचा कट रचणे, अपप्रेरणा देणे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपा वरून परवेज सरवर शेख,कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून पोलिसांनी तीन अग्नीशस्त्रे,तीन रिकाम्या मॅग्झिन आणि सहा जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सराईत गुन्हेगारांची संघटित गुन्हेगारी मोडण्यासाठी मोक्का‌ :

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून,त्यांच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या टोळीची संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी राजुरा पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाला मंजुरी देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), १९९९ मधील तरतुदी लागू करण्यास रीतसर परवानगी दिली आहे.

राजुरा पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदाच मोक्का कायद्यांतर्गत झालेल्या या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई‌ :

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर,पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे आणि पोलीस हवालदार कैलास आलाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

#Chandrapur Crime #Rajura firing case #MCOCA

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢