Gadchandur : शासकीय कामांसाठी नागरिकांकडून अवाजवी पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)कारवाईची मोहीम तीव्र केली असून,गडचांदूर येथे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरकारमान्य सेतू केंद्र चालकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.सचिन रामचंद्र खैरे (वय ४०,रा.गडचांदूर,वार्ड क्र.३,ता. कोरपना,जि.चंद्रपूर),असे कारवाई करण्यात आलेल्या सेतू केंद्र चालकाचे नाव आहे.तो गडचांदूर येथील ‘त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस’ हे सरकारमान्य सेतू केंद्र चालवतो.
या प्रकरणातील ५२ वर्षीय तक्रारदार नागरिकाला उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता.त्यासाठी त्यांनी गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस या सेतू केंद्राशी संपर्क साधला.उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी नियमानुसार ६९ रुपये शासकीय शुल्क आकारले जाते.मात्र,सेतू केंद्र चालक सचिन खैरे याने तक्रारदाराकडे शासकीय शुल्कासह एकूण २०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने प्रकरणाची पडताळणी केली.यावेळी तक्रारदार पंचांसह सेतू केंद्रात गेले असता,सचिन खैरे याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शासकीय शुल्कासह २०० रुपयांची मागणी केली.त्यानंतर तडजोडीअंती १५० रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.
लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सेतू केंद्रात सापळा रचला.त्यानुसार तक्रारदाराने सचिन खैरे याला शासकीय शुल्काचे ६९ रुपये आणि लाचेची रक्कम ८१ रुपये, असे एकूण १५० रुपये दिले.ही रक्कम त्याने पंचांसमक्ष स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून,गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :
ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान,अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत केदार यांनी सापळा पथकाचे नेतृत्व केले.कारवाईत पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे,पोलीस शिपाई अमोल सिडाम,राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम,महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले,चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम आणि संदीप कवरासे यांनी सहभाग घेतला.
लाचेची मागणी झाल्यास एसीबीशी संपर्काचे आवाहन :
शासकीय कामासाठी किंवा कोणत्याही दाखल्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधता येणार आहे.
#Gadchandur ACB Trap Action. #Crime News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
