Ashram School; Shocking Incident : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा? 31विद्यार्थी आजारी! नगराळा आश्रमशाळेतील प्रकार;|Marathi News.

News@Ashram School...

       Chandrapur : जिल्ह्यातील जिवती तालुका येथील नगराळा येथील 'अम्बु नाईक माध्यमिक आश्रमशाळा' येथे 1 सप्टेंबर मंगळवार रोजी धक्कादायक प्रकार घडला.नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण घेतल्यानंतर तब्बल 31विद्यार्थ्यांना उलट्या,पोटदुखी, मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने शाळा प्रशासनाने त्यांना तातडीने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

जेवणात पाल पडल्याची शक्यता; अंतिम निष्कर्ष तपासणी नंतरच‌ :

प्राथमिक माहितीनुसार,स्वयंपाकादरम्यान अन्नामध्ये पाल पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र,या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.अन्नाचे नमुने तपासल्यानंतर तसेच प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या अधिकृत चौकशीनंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या घटनेमुळे आश्रम शाळांमधील अन्नाची गुणवत्ता,स्वयंपाकगृहातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत नियमित तपासणी होते का? स्वयंपाक गृहांमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? आणि अन्नसुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याची मागणी :

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये,यासाठी या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.तसेच जिवती तालुक्यातील सर्व आश्रमशाळांमधील स्वयंपाकगृहे,अन्नाची गुणवत्ता,पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची तातडीने तपासणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आश्रमशाळा शासनाने स्वतः चालवाव्यात? :

आश्रमशाळांमध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात.त्यामुळे त्यांच्या अन्न,निवास आणि आरोग्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास आश्रमशाळांचे व्यवस्थापन,भोजन व्यवस्था आणि देखरेख यंत्रणेचा शासनाने गांभीर्याने पुनर्विचार करण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.

#Ashram school.#Nagarala Ashram School; Shocking incident.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢