Korpana : तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूरला स्वतंत्र तहसीलचा दर्जा देऊन याठिकाणी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करावा,अशी ठोस मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश काकडे,यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गडचांदूरला तहसीलचा दर्जा मिळाल्यास शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे काकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
'गडचांदूरला तहसीलचा दर्जा मिळावा', ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.मात्र,अद्यापही या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने गडचांदूरसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी सुमारे २० किलोमीटर अंतरावरील कोरपना येथे तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाण्यासोबतच त्यांना आर्थिक,शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार देवरावदादा भोंगळे यांनी या प्रश्नाचा शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करून गडचांदूर तहसील निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा,अशी मागणी रमेश काकडे यांनी केली आहे.
गडचांदूर व परिसरात विविध उद्योग,सिमेंट कारखाने,कोळसा खाणी,शैक्षणिक संस्था,शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच मोठी बाजारपेठ आहे.औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून गडचांदूरचा सातत्याने विस्तार होत आहे.त्यामुळे वाढती लोकसंख्या,प्रशासकीय गरजा आणि परिसराचा विकास लक्षात घेता स्वतंत्र तहसील कार्यालयाची आवश्यकता असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
गडचांदूर येथे स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू झाल्यास गडचांदूर शहरासह परिसरातील नागरिकांना महसूलविषयक सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील.त्यामुळे नागरिकांची कोरपना येथे होणारी वारंवारची धावपळ कमी होऊन प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व जलद होण्यास मदत होईल.याबाबत यापूर्वीही संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली असून,गडचांदूरला तहसीलचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे संबंधित पत्रव्यवहारातून स्पष्ट होत असल्याचे काकडे यांनी निवेदनात नमूद केले आहेत.
त्यामुळे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा विषय प्रभावीपणे मांडून गडचांदूर तहसील निर्मितीचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी विनंती वजा मागणी रमेश काकडे यांनी केली आहे.आता आमदार भोंगळे,या मागणीबाबत शासनदरबारी कितपत पाठपुरावा करतात आणि गडचांदूरच्या तहसील निर्मितीच्या प्रस्तावावर काय निर्णय होतो,याकडे गडचांदूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Gadchandur City News #Eye-catching demand #Chandrapur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
