Amalnala Dam Green Water Case : अमलनाला धरणाचे पाणी पुन्हा हिरवे! पिण्याच्या पाण्याचे संकट.|Marathi News.

News@Green water...

     Gadchandur : राजुरा व कोरपना तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अमलनाला मध्यम प्रकल्पातील पाण्याचा रंग पुन्हा एकदा हिरवट झाल्याने गडचांदूर व नांदा परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.गेल्या सात- आठ वर्षांनंतर यंदा पुन्हा धरणातील पाण्याचा रंग बदलल्याने या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकाराची तातडीने शास्त्रीय तपासणी करून नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गडचांदूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक विक्रम नामदेवराव येरणे यांनी केली आहे.

    येरणे यांनी सांगितले की,अमलनाला धरणातील पाण्याचा रंग बदलण्याची घटना यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्येही घडली होती. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)मार्फत पाण्याची तपासणी केली होती.तपासणीत पाण्यात शेवाळाची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते.त्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्यानंतर काही दिवसांत पाण्याचा रंग पूर्ववत झाल्याचे त्यांनी सांगितले.

                   'अमलनालाचेच पाणी वारंवार हिरवे का?'

कोरपना तालुक्यात अमलनाला आणि पाकडीगुड्डम हे दोन प्रमुख जलप्रकल्प आहेत.दोन्ही प्रकल्पांना माणिकगड पहाड परिसरातून पाणी मिळत असतानाही पाण्याचा रंग बदलण्याचा प्रकार वारंवार अमलनाला धरणातच का घडतो,याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे येरणे यांनी म्हटले आहे.एकाच परिसरातून पाण्याचा उगम होत असताना केवळ अमलनाला धरणातील पाण्याचा रंग वारंवार का बदलतो,यामागील नेमके कारण शोधणे आवश्यक आहे.संबंधित विभागांनी पाण्याचे नमुने घेऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी त्यांनी केली.

    'जुना पाणीपुरवठा स्रोत पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी.'

    २०२१ पासून अमलनाला धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्या नंतर गडचांदूर नगर परिषदेने ग्रामपंचायत काळातील जुना पाणीपुरवठा स्रोत बंद केला.त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची अमलनाला धरणावर मोठ्या प्रमाणात निर्भरता निर्माण झाली आहे.धरणातील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर भविष्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जुने पाणीपुरवठा स्रोत पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच गरज भासल्यास परिसरातील विहिरी,ट्युबवेल आदी पाण्याचे स्रोत अधिग्रहित करून त्यांचा उपयोग करण्याची मागणी विक्रम येरणे यांनी केली आहे.

 ‌                               'वेळीच लक्ष का गेले नाही?'

       अमलनाला धरणातील एन्टेक वेलवर नगर परिषद कर्मचारी तैनात असतानाही पाण्याचा रंग बदलल्याची बाब प्रशासनाच्या वेळीच निदर्शनास कशी आली नाही,असा सवालही येरणे यांनी उपस्थित केला आहे.पाण्याच्या रंगात बदल होताच उपाययोजना केल्या असत्या तर नागरिकांना निर्माण झालेल्या संभ्रमाला वेळीच उत्तर मिळाले असते,असे त्यांनी म्हटले.

           'पर्यटन आणि वॉटर पार्कवरही परिणामाची शक्यता.'

अमलनाला परिसरात सिंचन विभागाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि वॉटर पार्क उभारण्यात आले आहे.धरणातील पाण्याचा रंग वारंवार बदलत असल्याने या परिसरातील पर्यटनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाण्याच्या रंगबदला मागील नेमके कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे येरणे यांनी सांगितले.

   ‌‌   'गडचांदूर,नांदा परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम.'

सध्या अमलनाला धरणातून गडचांदूर नगर परिषद तसेच नांदा ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा केला जातो.त्यामुळे धरणातील पाण्याच्या रंगबदलाचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. गडचांदूर शहरातील सुमारे ५० हजार आणि नांदा परिसरातील सुमारे १५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

              'प्रशासनाच्या उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष!'

       अमलनाला धरणातील पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण काय,पाणी प्रक्रिया केल्यानंतर कोणत्या वापरासाठी सुरक्षित आहे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार,याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,सध्याच्या परिस्थितीत नगर परिषद प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या असून, गरजेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि मोफत वॉटर एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,तसेच पाण्याच्या गुणवत्तेबाबत अधिकृत तपासणी अहवालाची प्रतीक्षा करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

#Amalnala Dam Gadchandur #Green Water Case #Chandrapur.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢