Korpana : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत रस्त्यावर सापडलेला महागडा अँड्रॉइड मोबाईल त्याच्या मूळ मालकाचा शोध घेऊन सुखरूप परत केला.त्यांच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, "माणुसकी अजूनही जिवंत आहे" याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथील रहिवासी नारायण हिवरकर हे 10 जुलै रोजी काही कामानिमित्त तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे जात होते.आदिलाबाद–कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील उपाशा नाल्याजवळ त्यांना एका नामांकित कंपनीचा महागडा अँड्रॉइड मोबाईल रस्त्यावर पडलेला आढळला.मोबाईलचा मालक परत येईल,या अपेक्षेने त्यांनी काही काळ घटनास्थळी प्रतीक्षा केली.मात्र,कोणीही न आल्याने त्यांनी तत्काळ कोरपना पोलिसांना याबाबत माहिती देऊन,मोबाईल हरवल्याची तक्रार घेऊन कोणी आल्यास संबंधित व्यक्तीला स्वतःकडे पाठविण्याची विनंती केली.
त्यानंतर हिवरकर यांनी स्वतः पुढाकार घेत मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध सुरू केला.अखेर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना कोरपना येथे बोलावण्यात आले आणि मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.हा मोबाईल आदिलाबाद येथील शेख अब्दुल यांचा असून,ते पत्नीसमवेत गावाकडे जात असताना तो रस्त्यात पडल्याचे समोर आले आहे.
महागाईच्या काळात महागडा मोबाईल हरवल्याने शेख अब्दुल यांचे कुटुंब चिंतेत होते.मात्र,नारायण हिवरकर यांच्या प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे त्यांना त्यांचा मोबाईल सुखरूप परत मिळाला.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत हिवरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.मोबाईल हस्तांतरणावेळी शेख रिजवान,विठ्ठल गेडाम,सुख्या बेग आणि शुभम देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी शेख अब्दुल दाम्पत्यांनी नारायण हिवरकर यांच्या प्रामाणिकपणाचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या सामाजिक जाणिवेला सलाम केला.
#Admirable work. #Korpana News. #Chandrspur District News
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
