'Is this the Vision of Development?'- Sachin Bhoyar's attack : 'त्या' कामासाठी ₹72 लाखांचा खर्च; "हेच का विकासाचे व्हिजन?" सचिन भोयर यांचा घरचा आहेर!|Marathi News.

News@Vision of Development...?

 Gadchandur : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपालिकेची स्थापना २०१४ मध्ये झाली.स्थापनेला जवळपास १२ वर्षांचा कालावधी उलटूनही शहरातील अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे चित्र आहे अशा परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याऐवजी नगरपालिकेच्या जुन्या कार्यालय (सभागृह) इमारतीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ₹72 लाख 13 हजार 787 खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे स्वीकृत सदस्य सचिन भोयर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

            भोयर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक प्रभागांमध्ये आजही पावसाळ्यात नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.प्रभाग क्रमांक १ मध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत असून,माजी आमदार सुभाष धोटे यांच्या निधीतून खडीकरणाचे काम झाल्यानंतरही काँक्रीट रस्ता व ड्रेनेजची कामे अद्याप प्रलंबित आहेत.प्रभाग क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची समस्या असून नाली,खुल्या जागांचे सुशोभीकरण आदी विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.याचप्रमाणे इतर अनेक प्रभागांमध्येही मूलभूत विकास कामे रखडलेली आहेत.अशा परिस्थितीत नगर परिषदच्या विद्यमान कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च करणे कितपत योग्य आहे,असा सवाल भोयर यांनी उपस्थित केला आहे.सध्याच्या कार्यालयात वातानुकूलित (AC)कक्षांसह आवश्यक सुविधा उपलब्ध असताना आणखी "लक्झरी ऑफिस" उभारण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांवर निधी खर्च करणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.      "गडचांदूरकरांची अपेक्षा भव्य आणि सुसज्ज नगर परिषदेची इमारत उभी राहावी अशीच आहे.मात्र,त्यापूर्वी शहरातील नागरिकांना रस्ते,नाली,पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.शहरात विकास कामांचा मोठा अनुशेष असताना कार्यालयाच्या नूतनीकरणावर ₹72 लाख खर्च करणे म्हणजे विकासाच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे," असा घणाघात भोयर यांनी केला.

    दरम्यान,गडचांदूर नगर परिषदेत शहर विकास आघाडी आणि काँग्रेसची सत्ता असून भाजप विरोधी बाकांवर आहे.विशेष म्हणजे काँग्रेसचेच स्वीकृत सदस्य असलेल्या सचिन भोयर यांनी सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावर सार्वजनिकरीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या भूमिकेला  "घरचा आहेर" असे संबोधले जात असून, अद्याप सत्ताधारी गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विरोधी पक्षाकडूनही या विषयावर ठोस भूमिका समोर आलेली नसल्याने पुढे या प्रकरणात कोणते राजकीय व प्रशासकीय पडसाद उमटतात,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

#'Is this the vision of development?'(Sachin Bhoyar's attack #Gachandur Nagar Parishad #Marath News.

                        $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$