Chandrapur : जिल्ह्यातील काँग्रेसच्या बल्लारपूर शहराध्यक्ष, सरकारी वकील तथा नगरसेविका ॲड.मेघा भाले यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह,अश्लील व शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात भाजपच्या वतीने गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,संबंधित व्हिडिओमधील भाषा सार्वजनिक जीवनातील जबाबदार व्यक्तीस शोभणारी नसून लोकशाही मूल्ये संविधानिक संस्था आणि सार्वजनिक सभ्यतेचा अवमान करणारी आहे.
निवेदनानुसार,सरकारी वकील आणि नगरसेविका,अशा जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे गंभीर स्वरूपाचे असून सार्वजनिक जीवनातील मर्यादांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला, तरी शिवराळ,अवमानकारक किंवा चिथावणीखोर भाषा वापरणे योग्य नसल्याचेही भाजपने निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत संबंधित व्हिडिओची चौकशी करून प्रचलित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवावा,तसेच आवश्यक ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय,ॲड.मेघा भाले या सरकारी वकील असल्याने त्यांच्या वर्तनाची शासनानेही दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान,या मागण्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.स्मिता चिताडे,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,कोषाध्यक्ष सौ.अपर्णा उपलेंचवार,भाजपा शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. शीतल धोटे,उपाध्यक्षा सौ.जया लोहे,महामंत्री उमा कंठाळे, उपाध्यक्षा पौर्णिमा आवळे इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
#Political news.#Gadchandur BJP Aggressive.#Congress. #Chandrapur. #Politics #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
