Tukaram Mundhe : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबाबतची कारवाई आणखी तीव्र करत आता दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.हॉटेल,पनीर विक्रेते आणि बेकरी व्यवसायां वरील धडक कारवाईनंतर विभागाने राज्यभर 'Save Food Save Drug' ही विशेष मोहीम सुरू केली असून दूध पुरवठा साखळी साठी नवीन आणि कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे म्हणाले की,दूध हा प्रत्येकाच्या आहारातील अत्यावश्यक घटक असल्याने दूध उत्पादकांपासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत अन्न- सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.दुधातील भेसळ व कृत्रिम(Synthetic)दूध विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत.
मुंढे यांनी सांगितले की,दूध संकलन केंद्र,कुलिंग सेंटर,पॅकर्स, वितरक,किरकोळ विक्रेते तसेच पनीर,खवा,लोणी,क्रीम,चीज आणि आईस्क्रीम उत्पादक व विक्रेत्यांसाठी एकूण आठ प्रकारचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.यापूर्वी हॉटेल व्यवसायिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की,अनेकांनी आवश्यक सुधारणा केल्या असल्या तरी,काही ठिकाणी बनावट पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळून आले.अशा प्रकरणांमध्ये संबंधितांचे परवाने रद्द करण्यात आले असून केवळ कागदपत्रे नव्हे,तर प्रत्यक्ष नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
"संकलनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कडक नियम."
महाराष्ट्र शासनाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी आदेश जारी केला आहे दूध संकलन,शीतकरण,प्रक्रिया,पॅकेजिंग,साठवणूक,वाहतूक, वितरण आणि विक्री या प्रत्येक टप्प्यावर नव्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे,प्रामाणिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात सुरक्षित अन्न संस्कृती विकसित करणे हा आहे तपासण्या आणि नमुना विश्लेषणादरम्यान दूध पुरवठा साखळीत सातत्याने गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे ही नियमावली लागू करण्यात आल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
"तपासणीत आढळलेल्या प्रमुख अनियमितता."
▪️दुधात पाण्याची भेसळ.
▪️कृत्रिम (Synthetic) दूध तयार करून विक्री.
▪️युरिया,डिटर्जंट,कॉस्टिक सोडा,स्टार्च,ग्लुकोज आणि
मेलामाइनसारख्या रसायनांचा वापर.
▪️मिल्क फॅट आणि SNF मानकांचे उल्लंघन.
▪️शीतसाखळी(Cold Chain)नियमांचे पालन न करणे.
▪️विनापरवाना किंवा विना नोंदणी व्यवसाय.
▪️चुकीच्या लेबलिंगद्वारे ग्राहकांची दिशाभूल.
अन्न व औषध प्रशासनाने संबंधित सर्व व्यावसायिकांना नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
#Tukaram Mundhe on milk adulteration.#Save Food Save Drug.#FDA.#Save Food Save Drug.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
