Chandrapur : जिल्ह्यातील चिमूर येथे एका बिअर बारच्या आड देहव्यापार चालविल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्या नंतर संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी १६ जून २०२६ रोजी याबाबत आदेश जारी केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,१६ मे २०२६ रोजी चिमूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आझाद वॉर्ड येथील 'वनिता बिअर बार अँड रेस्टॉरंट' येथे छापा टाकण्यात आला.तपासादरम्यान बारच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर महिलांकडून देहव्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. यावेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम यांच्या तक्रारीवरून बार संचालिका वनिता जगन रंगारी यांच्याविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ नोंद करण्यात आला.भारतीय न्याय संहिता कलम १४३(२)तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA Act)१९५६ अंतर्गत कलम ३,४,५,६ व ७ अन्वये कारवाई करण्यात आली.आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस तपासात बारचा वापर प्रामुख्याने देहव्यवसायासाठी होत असल्याचे पुरावे समोर आल्याने संबंधित परवानाधारक आस्थापनाविरोधात कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली. सदर बार दाट लोकवस्तीच्या परिसरात असून आसपास मशिदी व बुद्ध विहारासारखी धार्मिक स्थळे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता.त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.
जिल्हाधिकाऱ्यांनी अबकारी विभागाकडूनही स्वतंत्र अहवाल मागवून घेतला.पोलीस व अबकारी विभागाच्या अहवालांतील निष्कर्ष सुसंगत आढळून आल्याने संबंधित बारचा FL-III-446 क्रमांकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान,या आस्थापनाविरोधात परिसरातील नागरिकांनी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा लेखी तक्रारी व निवेदने दिली होती.परवाना रद्द झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
#Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$_
