Action by Gadchandur Police : गडचांदूर पोलिसांची 'श्री साई पान पॅलेस'वर धडक कारवाई;प्रतिबंधित गुटखा-खर्र्यासह ₹ 24 हजारांचा मुद्देमाल जप्त!|Marathi News.

News@Crime...

  Gadchandur : राज्यात प्रतिबंधित गुटखा,पानमसाला,सुगंधित तंबाखू व खर्रा यांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गडचांदूर पोलिसांनी गांधी चौक परिसरातील 'श्री साई पान पॅलेस' या दुकानावर धडक कारवाई करत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह पॅकिंग साहित्य असा ₹ 24,276 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत दुकानातील नोकराला ताब्यात घेण्यात आले असून दुकान मालक पोलिसांना चकमा देत फरार झाला आहे.

गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गांधी चौकातील 'श्री साई पान पॅलेस'वर छापा टाकण्यात आला कारवाईदरम्यान दुकानाचा मालक विनोद तराळे (वय 45,रा.गडचांदूर),हा घटना स्थळावरून पसार झाला.तर दुकानात उपस्थित असलेला नोकर अमोल टेकाम(वय 34,रा.गडचांदूर)याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

छाप्यात दुकानातून 11.123किलो प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, विविध ब्रँडचे पानमसाले,सुगंधित तंबाखू,फ्लेवर्ड हुक्का मोलॅसेस, सुपारी तसेच गुटखा-खर्रा पॅकिंगसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील पॉलिथिन पिशव्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. अन्नपदार्थ व पॅकिंग साहित्य मिळून एकूण ₹ 24,276 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,तो पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन(FDA),चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात विनोद तराळे व अमोल टेकाम यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS)कलम 123,223, 274 व 275 अन्वये गुन्हा क्रमांक 0370 दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी.गोदे व त्यांच्या पथकाने केली.पुढील तपास सपोनि.एस.पी. गोदे हे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

                      'जिल्हाभरात FDA ची धडक मोहीम.'

दरम्यान,नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा,सुगंधित तंबाखू, पानमसाला व खर्रा यांच्या अवैध विक्री विरोधात FDA ने चंद्रपूर जिल्ह्यात व्यापक मोहीम सुरू केली आहे.दुर्गापूर,गडचांदूर आणि गोंडपिपरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये एकूण ₹ 44,365 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीं विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

                          'मकोका' कारवाईचाही इशारा.

FDA ने स्पष्ट केले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुटखा,पानमसाला,सुगंधित तंबाखू,खर्रा व सुगंधित सुपारी यांच्या उत्पादन,साठवणूक,वाहतूक आणि विक्रीवर राज्यभर बंदी आहे.या पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.त्यामुळे केवळ आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

याशिवाय,अशा आरोपींचा संबंध संघटित गुन्हेगारी किंवा अमली पदार्थांच्या तस्करीशी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा इशारा FDA ने दिला आहे.धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व खर्रा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

#Crime News.#Action by Gadchandur Police.

                                               $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$