Gadchandur: नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा,स्थायीसमिती तसेच,विशेष सभांचे मंजूर ठराव आणि इतिवृत्त प्रत्येक सभेनंतर कमाल 7 दिवसांच्या आत नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)वर प्रकाशित करण्यात यावेत,अशी मागणी गडचांदूर नगर परिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक 'सुरज पांडे' यांनी न.प.मुख्याधिकारी आशिष चौहान,यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,नगर परिषदेच्या सभांचे ठराव व इतिवृत्त,संकेतस्थळावर नियमितपणे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना आवश्यक माहिती मिळविण्यासाठी वारंवार अर्ज करावे लागतात.अनेकदा माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अर्ज करण्याची वेळ येते.यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून प्रशासनावरही अनावश्यक ताण निर्माण होत आहेत.
सभागृहात झालेली चर्चा आणि प्रत्यक्ष मंजूर झालेले ठराव किंवा इतिवृत्त यामध्ये कोणतीही तफावत असल्याचा संशय निर्माण होऊ नये तसेच प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढावे यासाठी सर्व मंजूर ठराव व इतिवृत्त नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक पांडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम,2005 मधील क शलम 4(1)(ब)आणि 4(2)चा संदर्भ देत,सार्वजनिक प्राधिकरणांनी जनहिताची माहिती स्वयंस्फूर्तीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित केले. त्यानुसार नगर परिषदेच्या सर्वसाधारण,स्थायी समिती आणि विशेष सभांचे मंजूर ठराव व इतिवृत्त प्रत्येक सभेनंतर सात दिवसांच्या आत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर,यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
#Gadchandur Nagar Parishad.#Important Demand.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
