Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू!|Marathi News.

News@Shocking...

Chandrapur : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात समृद्धी महामार्गावर रविवारी (२८ जून) दुपारी सुमारे १२ ते १२.१५ वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे बाबुपेठ परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये महादेव जिवाजी जीवने (६५),लताबाई महादेव जीवने (६०),भास्कर महादेव जीवने (४३),आरती भास्कर जीवने (४१) आणि जीज्ञा भास्कर जीवने(१२)(सर्व रा.बाबुपेठ,चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

  प्राथमिक माहितीनुसार,भरधाव वेगातील वॅगनार कार उभ्या असलेल्या कंटेनरवर मागून आदळली.धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसून वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला.प्राथमिक अंदाजानुसार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

   घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस व स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.कारमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढून धामणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार,भास्कर जीवने हे भटाळी येथील WCL कार्यशाळेचे प्रमुख होते.त्यांनी अवघ्या १५ दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला होता.त्यांची पत्नी आरती जीवने यांची नुकतीच अकोला येथे शासकीय सेवेत बदली झाली होती.त्या पदभार स्वीकारण्यासाठी संपूर्ण कुटुंब अकोल्याकडे निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

                          'सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.'

समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दीर्घ प्रवासादरम्यान थकवा किंवा झोप येत असल्यास वाहनचालकांनी तात्काळ वे-साईड अमेनिटीज (Way-side Amenities)किंवा जवळच्या पेट्रोल पंपावर थांबून विश्रांती घेणे आवश्यक आहे.थकवा,निष्काळजीपणा आणि अतिवेगामुळे अनेक मौल्यवान जीव या महामार्गावर गमवावे लागले असून, वाहनचालकांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

#Samruddhi Mahamarg Accident.

#Shocking incident.

                              $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$