Gadchandur : अन्न व औषध प्रशासन (FDA)आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळखोर व अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.भेसळयुक्त अन्नपदार्थ,प्रतिबंधित गुटखा आणि अन्य अवैध व्यवसायांविरोधात प्रशासनाने उचललेल्या कठोर पावलांचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे.Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe.
मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाचे पथक विविध ठिकाणी सातत्याने तपासणी आणि कारवाई करत असल्याने अनेक व्यापारी सतर्क झाले आहेत.परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की,प्रशासनाचे पथक येणार असल्याच्या केवळ चर्चेनेही अनेक ठिकाणी दुकाने आणि पानटपऱ्या तातडीने बंद केल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी(१६ जून)दुपारच्या सुमारास FDA चे पथक गडचांदूर शहरात दाखल झाल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली.या चर्चेनंतर कारवाईच्या भीतीने अनेक लहान-मोठ्या पानटपरी चालकांनी आपापली दुकाने बंद करून घराचा रस्ता धरला.अचानक बंद झालेल्या पानटपऱ्यांमुळे खर्रा व तंबाखू सेवन करणाऱ्यांची मात्र चांगलीच गैरसोय झाली.
दरम्यान,एफडीएचे पथक शहरात आले असून काही ठिकाणी कारवाई केल्याची चर्चा दिवसभर रंगली.मात्र,याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.संध्याकाळनंतर ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट होताच काही पानटपरी चालकांनी पुन्हा दुकाने सुरू केल्याचे दिसून आले.
एकंदरीत,अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांचा प्रभाव इतका वाढला आहे की,केवळ कारवाईच्या शक्यतेनेही संबंधित व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण होत आहे.शहरात सध्या "तुकाराम मुंढे... नाम ही काफी है !" अशी उपरोधिक चर्चा रंगताना दिसत आहे.
#Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe. #Pan Shop Close In Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
