Chandrapur : जिल्ह्यातील जुनोना एफडीसीएम अंतर्गत येणाऱ्या सातारा भोसले परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२३ जुलै)दुपारच्या सुमारास घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.मृताची ओळख उष्टू वारलू पोरेते(वय ५५ रा.सातारा भोसले) अशी झाली आहे.ते आपल्या गुरांसह जंगल परिसरात गेले असताना कक्ष क्रमांक ४४१ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,परिसरात वाघाच्या वाढत्या वावरामुळे गावकऱ्यांनी गुरे चारण्यासाठी दोन-दोन जणांची पाळी ठेवली होती.त्यानुसार उष्टू पोरेते आणि निळकंठ पेंदोर हे दोघे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते.दरम्यान,वाघाने अचानक झडप घालत उष्टू पोरेते यांच्यावर हल्ला केला.त्यांच्यासोबत असलेले निळकंठ पेंदोर यांनी प्रसंगावधान राखत तेथून सुटका करून घेतल्याने त्यांचा जीव वाचला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तसेच उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोनवणे आणि त्यांच्या पथकाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
उष्टू पोरेते यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शेती व गुरे चारण्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान,सातारा भोसले परिसरात वाघाची दहशत कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,मृताच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी तसेच कुटुंबातील एका वारसाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
#Tiger Attack News. #Satara Bhosale Area.#Chandrapur.#Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
