Korpana : गडचांदूर नगर परिषदेतील विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक सुरज रामभवन पांडे यांच्याविरुद्ध स्थानिक 39 वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र,ही कारवाई अवैध धंद्यांविरोधात सातत्याने तक्रारी केल्याचा सूड म्हणून करण्यात आल्याचा गंभीर आरोप पांडे यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र,निष्पक्ष आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना निवेदन सादर केले असून पोलीस महासंचालक,अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक,नागपूर परिक्षेत्र यांनाही निवेदन पाठविल्याची माहिती पत्रकार परिषदेत पांडे यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पांडे यांनी सांगितले की,नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी गडचांदूर शहरातील अवैध दारू विक्री,जुगार,मटका,गो-तस्करीसह विविध अवैध धंद्यांविरोधात सातत्याने लेखी व तोंडी तक्रारी केल्या.मात्र, संबंधित अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला.त्यानंतरच आपल्या विरोधात विविध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की,यापूर्वी स्वतःवरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपीविरुद्ध बनावट कागद पत्रांबाबत तक्रार केल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर वैयक्तिक वैमनस्य निर्माण झाले असून काही पोलीस अधिकारी व संबंधित व्यक्तींनी संगनमत करून आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा संशय आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलीस ठाण्याकडे असल्याने ती अन्य वरिष्ठ व निष्पक्ष अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावी,चौकशीदरम्यान कोणताही दबाव आणू नये,भविष्यात खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत यासाठी संरक्षण द्यावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच,चौकशीत आपण दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई स्वीकारण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र,आरोप खोटे ठरल्यास संबंधित पोलीस अधिकारी व दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान,या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.सूरज पांडे यांनी केलेले आरोप हे त्यांची भूमिका असून त्याबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.पत्रकार परिषदेला तालुका भाजप संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे,नगरसेवक तथा गटनेते सतीश बेतावार,नगरसेवक हिमांशू नामवाड,नगरसेविका कीर्ती वैरागडे,नगरसेविका संगीता गाऊत्रे,महामंत्री उमा कंठाळे,रमेश चौधरी,अरविंद कोरे,विनोद इंगळे,यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
SEO Keywords: कोरपना न्यूज, गडचांदूर न्यूज, सुरज पांडे, भाजप नगरसेवक, गडचांदूर पोलीस, विनयभंग प्रकरण, Chandrapur News,Korpana News, Gadchandur News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
