Chandrapur : कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक 'सूरज पांडे' यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,यांना दिलेल्या निवेदनातून केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,संबंधित नगरसेवका विरुद्ध भारतीय न्याय संहिता(BNS)अंतर्गत विनयभंग,घरात घुसखोरी,अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
निवेदनानुसार,संबंधित नगरसेवक यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिले असून प्रकाश निमजे यांना मारहाण करणे तसेच निवडणुकीदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचे आरोप यापूर्वीही त्यांच्यावर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधी हा समाजासाठी आदर्श असावा,अशी जनतेची अपेक्षा असते.मात्र गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा कमी होत असून पदाचा धाक दाखवून महिलांना धमकावणे,सभ्य नागरिकांना मारहाण करणे आणि सत्तेचा गैरवापर करणे अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये,अशी भूमिका काँग्रेसने निवेदनातून मांडली.
देशात व राज्यात महिलांवरील अत्याचार,गैरवर्तन, दडपशाही आणि सत्तेच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्याचे नमूद करत प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घ्यावी,पीडित महिलेला न्याय व आवश्यक संरक्षण द्यावे,संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नगरसेवक पदाबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे,गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजय मेंढी, गटनेत्या प्रणिता उपाध्ये,सभापती तुषार बावणे,शहराध्यक्ष संतोष महाडोळे,नगरसेवक एहजाज अहमद,चेतन शेंडे,शैलेश लोखंडे, विवेक येरणे,पिडित महिला तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Congress is aggressive on the molestation case.#Gadchandur News.#Crime News.#Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
