Chandrapur : ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत भुज उपक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात गुरुवारी(दि.9)दुपारी वाघाच्या हल्ल्यात एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रानभाजी तोडण्यासाठी जंगलालगतच्या कुरणात गेलेल्या अनिल भास्कर दिवटे(वय 30,रा.बल्लारपूर)यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने शोधमोहीम व सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,दक्षिण वनपरिक्षेत्रातील भुज उपक्षेत्राच्या पद्मापूर नियतक्षेत्रातील मौजा पद्मापूर चक जंगला लगतच्या कुरण गट क्रमांक 21 मध्ये अनिल दिवटे,हे दुपारी रानभाजी तोडण्यासाठी गेले होते.यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्या मानेवर प्राणघातक हल्ला केला.हल्ला इतका भीषण होता की,गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी सविस्तर पंचनामा करण्यात आला.पंचनाम्यादरम्यान मृताच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दात व नखांच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच,घटनास्थळी त्यांनी गोळा केलेल्या रानभाजीची पिशवीही पडलेली होती.या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे वाघाच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने नोंदविला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ब्रम्हपुरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पंचनाम्या वेळी सहाय्यक वनसंरक्षक(प्रादेशिक व वन्यजीव)एम.बी. गायकवाड,दक्षिण ब्रम्हपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.व्ही. सोनडवले,क्षेत्र सहाय्यक एस.एम.लोणारे,पद्मापूरचे नियतक्षेत्र वनरक्षक व्ही.एम.आदे,वनविभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस उपस्थित होते.पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय,ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आला.
दरम्यान,घटनेनंतर वनविभागाने संबंधित परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे बसवले असून वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे.वाघाचा माग काढण्याचे काम सुरू असून नागरिकांनी जंगलात किंवा जंगलालगतच्या भागात एकटे जाऊ नये,रानभाजी,सरपण अथवा अन्य वनउपज गोळा करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी,असे आवाहन वन प्रशासनाने केले आहे.
#Padmapur Chak Forest Youth Killed By Tiger.#Chandrapur Tiger Attack Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
