Gadchandur : नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात देशभर उभारण्यात आलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थी,तरुण आणि सामाजिक संघटनांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.दिल्लीतील जंतर-मंतरसह अनेक शहरांमध्ये आंदोलनकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२७ जुलै)गडचांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडी आणि भीम आर्मीच्या वतीने नागरिक व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात लोकशाही मार्गाने उभारण्यात आलेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर आणि भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर मित्रपरिवारातर्फे करण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमाचे आयोजक भीम आर्मीचे बोरकर, वंचितचे चुनारकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.सोमा गोंडाणे,कोरपना तालुका प्रमुख बादल चांदेकर,समता सैनिक दलाचे पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडीचे पिंटू रामटेके,समाधान सोनकांबडे,राहुल बोरकर,शरद बोरकर,अमित थोरात,अनिल सूर्यतळ,अनिल दुर्गे,सुनील दुर्गे, सुरेश ताडे,अक्षय गोरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,भीम आर्मी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडला.उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाच्या यशाचे स्वागत करत मिठाई वाटपातून आनंद व्यक्त केला.
#Student movement Successful. #Dharmendra Pradhan Resignation.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
