Gadchandur : नगर परिषदेच्या विविध विकासकामांच्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबत शहरात सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.अलीकडेच झालेल्या तीन निविदा अंदाजे १० ते १५ टक्के कमी दरात मंजूर झाल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे नगर परिषदेची जवळपास ₹२५ लाखांची बचत होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर,यापूर्वीही सर्व विकासकामांच्या निविदा अशाच प्रकारे खुल्या व पारदर्शक स्पर्धेद्वारे झाल्या असत्या,तर नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ झाला असता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पूर्वीच्या प्रक्रियेकडे अनावधानाने झालेली त्रुटी म्हणून पाहायचे की,त्यामागे अन्य काही कारण होते,याबाबतही नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.मात्र,पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या स्पर्धात्मक निविदांमुळे नगर परिषदेचा आर्थिक फायदा होत असल्याचे मत अनेक जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान,कमी दरात काम स्वीकारलेल्या कंत्राटदारांना नगर परिषदेचे सत्ताधारी व प्रशासनाकडून कामकाज आणि बिल प्रक्रियेत आवश्यक सहकार्य मिळणार की,त्यांना अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागणार,याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.भविष्यात विविध प्रकारचे अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम शहरातील विकासकामांवर होऊ शकतो, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार,पूर्वीच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी सुरू झाल्यानंतर आगामी काळात निविदा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता,स्पर्धात्मकता आणि आर्थिक शिस्त राखली जाईल,अशी अपेक्षा काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
#Development works in Gadchandur city. #Open and Transparent Tender.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
