Monsoon Session 2026 : महिलांच्या सन्मानासाठी मोठे पाऊल; सरकार ॲक्शन मोडमध्ये,आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या विधेयकाची दखल!| Marathi News.

News@Maharashtra Assembly 2026...

              MLA Sudhir Mungantiwar : महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अशासकीय विधेयकावरील चर्चेनंतर सरकारने विद्यमान कायद्यांतील दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आवश्यक कायदेबदलांसाठी केंद्र सरकारशी समन्वय साधण्याचेही स्पष्ट करण्यात आले.

      राज्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की,महिलांचे असभ्य चित्रण,अश्लीलता आणि लैंगिक गुन्ह्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींना सरकार अजिबात सहन करणार नाही.भारतीय न्याय संहिता,स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध)अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इतर संबंधित कायद्यांचा पुनर्विचार करून दंडात्मक तरतुदी अधिक प्रभावी करण्यात येतील.

यासाठी कायदेतज्ज्ञ,महिला हक्क कार्यकर्ते,सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे.समितीच्या शिफारशींनुसार आवश्यक कायदेबदल करण्यासाठी केंद्र सरकारकडेही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

      चर्चेदरम्यान आ.सुधीर मुनगंटीवार यांनी समाजमाध्यमे,संकेत स्थळे,डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील जाहिरात फलकांद्वारे महिलांचा अवमान करणाऱ्या आणि लैंगिक अपराधांना खतपाणी घालणाऱ्या आशयावर प्रभावी नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित केली.महिलांचा सन्मान,सामाजिक मूल्यांचे संरक्षण आणि युवकांमध्ये सकारात्मक सामाजिक संस्कार रुजविण्यासाठी कठोर कायदेशीर यंत्रणा उभी करण्याची मागणी त्यांनी केली.

   सरकारने या मागणीची गंभीर दखल घेत,तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केल्याने राज्यात महिलांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी आणि अश्लील व विकृत आशयाविरोधात अधिक कठोर कायदेशीर चौकट उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.

#Monsoon Session 2026.#MLA Sudhir Mungantiwar.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$