Gadchandur : शहरातील कमी व्होल्टेज,अपुरा वीजपुरवठा आणि विद्युत सुरक्षेशी संबंधित विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी गडचांदूर नगर परिषदेत विरोधी पक्ष भाजपच्या नगरसेविका सौ.शितल धोटे आणि भाजपा कोरपना तालुका संघटन महामंत्री तथा स्विकृत नगरसेवक सतीश उपलेंचवार यांनी गडचांदूर महावितरणच्या उपअभियंत्यांकडे स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत.या मागण्यांमुळे स्थानिक महावितरणच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नगरसेविका सौ.धोटे यांनी दिलेल्या निवेदनात प्रभाग क्रमांक 4 मधील विक्रम येरणे,बाळा खापणे व कोंडेकर यांच्या घरासमोरील परिसरात सध्या सिंगल-फेज वीजपुरवठा असल्याने नागरिकांना वारंवार कमी व्होल्टेजचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे दिवे मंद होणे,घरगुती विद्युत उपकरणे व्यवस्थित न चालणे तसेच दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची बाब त्यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिली.या परिसरात सिंगल-फेजऐवजी थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा,जेणेकरून नागरिकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल आणि कमी व्होल्टेजची समस्या कायमस्वरूपी दूर होईल,अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरीकडे,भाजप कोरपना तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी शहरातील विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांमधून विद्युत तारा गेल्याने पावसाळ्यात करंट उतरण्याचा धोका वाढला असून अनेक डीपीवरील फ्यूज बॉक्सची झाकणे उघडी असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करून उघड्या डीपी सुरक्षित करण्यात याव्यात,अशी त्यांनी मागणी केली आहे.याशिवाय प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मध्ये वारंवार कमी-जास्त व्होल्टेजचा त्रास होत असल्याने,या दोन्ही भागांसाठी स्वतंत्र डीपी मंजूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,अशीही मागणी उपलेंचवार यांनी निवेदनातून केली आहे.
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि सुरक्षिततेशी संबंधित या समस्यांवर महावितरण प्रशासन किती वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाई करते,याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देताना सौ.शितल धोटे यांच्यासह सतीश उपलेंचवार,संजय मुसळे,महेश घरोटे, मोहन भारती,अरविंद कोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
#Gadchandur Mahavitaran.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
