Korpana : तालुक्यातील मौजा बाखर्डी येथील शेतकरी सुरेश उद्धव पानघाटे यांच्या सर्वे क्र.109/1,109/2 व 109/3 मधील शेताला मागील 15 वर्षांपासून महावितरणकडून नियमित विद्युत पुरवठा होत होता.मात्र,यावर्षी उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही तो अद्याप सुरू करण्यात आलेला नसल्याने शेतकरी गंभीर अडचणीत सापडला आहे.
पानघाटे यांनी 17 जून 2026 रोजी मिरची लागवडीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची लेखी विनंती महावितरणकडे केली होती.मात्र,प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.परिणामी वेळेत सिंचन करता न आल्याने मिरची लागवडीचे नियोजन रद्द करावे लागले असून त्यांचा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान,29 जून 2026 रोजी शेताकडे जाणाऱ्या 5 विद्युत खांबांवरील संपूर्ण वायरिंग अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याने शेताचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.आधीच अपुऱ्या पावसामुळे पिकांवर संकट ओढावले असताना,वीज उपलब्ध नसल्याने सिंचन करणेही अशक्य बनले आहे.त्यामुळे शेतीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत होऊन मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे पानघाटे यांनी सांगितले.
याप्रकरणी महावितरणने चोरीस गेलेले वायरिंग तात्काळ बसवून शेताचा वीजपुरवठा पूर्ववत करावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच,यापुढे होणाऱ्या सर्व आर्थिक नुकसानीस महावितरण प्रशासन जबाबदार राहील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून,महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून बाधित शेतकऱ्याला दिलासा द्यावा,अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
#Farmer Electricity issue in korpana taluka. #Electricity issue case. #Marathi News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
