Cyber Crime : अज्ञात कॉलवर विश्वास महागात; मोबाईल हॅक करून व्हॉट्सॲपवरून पैशांची मागणी!| Marathi News.

News@Cyber Crime...

Korpana : अज्ञात क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलवर विश्वास ठेवल्याने मोबाईल हॅक होऊन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कातील व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोरपना येथे घडली आहे.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा फसव्या कॉल पासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कोरपना येथील एक शिक्षक सोमवार (दि.२९ जून)रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता तुकडोजीनगर येथील जगन्नाथ बाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला.समोरच्या व्यक्तीने स्वतःला डिलिव्हरीशी संबंधित असल्याचे सांगत, "डिलिव्हरी बॉय कोरपना बसस्थानक परिसरात आला आहे.त्याला तुमचे घर सापडत नाही.मी त्याचा मोबाईल नंबर देतो,तुम्ही त्याला कॉल करा," अशी बतावणी केली.

       संशय न बाळगता सदर शिक्षकाने दिलेल्या क्रमांकावर कॉल केला.त्यानंतर काही वेळातच सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल वरील नियंत्रण मिळवून व्हॉट्सॲपचा गैरवापर केला. त्यांच्या संपर्क यादीतील अनेक व्यक्तींना तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगत आर्थिक मदतीची मागणी करणारे संदेश पाठविण्यात आले.

मात्र,संबंधित संदेश प्राप्त झालेल्या काही मित्र व परिचितांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधून पैशांची गरज कशासाठी आहे,अशी विचारणा केली.त्यावेळी आपण असे कोणतेही संदेश पाठविले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर हा संपूर्ण सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणाची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती असून सायबर सेलने तत्काळ तपास सुरू करून सायबर भामट्यांचा शोध सुरू केल्याचे कळते.

                            'नागरिकांनी घ्यावी ही काळजी.'

सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या वापरत असल्याने कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून अनोळखी क्रमांकावर कॉल करू नये.तसेच ओटीपी,संशयास्पद लिंक,अथवा कोणतेही ॲप डाउनलोड करण्याच्या सूचना पाळू नयेत.संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#Cyber Crime Case.#Korpana police Station.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$