Chandrapur Traffic Police : चंद्रपुरात अल्पवयीन वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 65 जण ताब्यात,वाहने जप्त!|Marathi News.

News@Minor Driving...

Chandrapur : शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सर्रास दुचाकी चालवण्याचे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष धडक मोहीम राबवली.वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 7 ते 9 या वेळेत झालेल्या कारवाईत तब्बल 65 अल्पवयीन वाहनचालकांना पकडून त्यांची वाहने जप्त करण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे अपुरे ज्ञान,बेदरकार वाहनचालक वृत्ती आणि त्यामुळे वाढणाऱ्या अपघातांच्या धोक्याचा विचार करून ही मोहीम हाती घेण्यात आली.कारवाई दरम्यान पकडण्यात आलेली सर्व वाहने वाहतूक पोलीस कार्यालयात आणण्यात आली.

सायंकाळी संबंधित अल्पवयीन चालकांच्या पालकांना वाहतूक शाखेत बोलावण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्वतः पालकांसोबत संवाद साधत म्हणाले की, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून त्यामुळे त्यांच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो,याची सविस्तर जाणीव करून दिली.

ही पहिलीच व्यापक कारवाई असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत प्रत्येक प्रकरणात 500 रुपयांचा नाममात्र दंड आकारून वाहने सोडली.मात्र,भविष्यात पुन्हा असे घडल्यास संबंधित पालकांवर थेट गुन्हा दाखल करून 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल,असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.या कारवाईमुळे शहरातील पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून,अल्पवयीन मुलांना वाहन देण्याबाबत अनेकांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान,या कारवाईनंतर शहरात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.सुमारे दोन वर्षांपूर्वीही अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई आणि पालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता.मात्र,त्यानंतर प्रत्यक्षात प्रभावी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे "ही मोहीम सातत्याने सुरू राहणार की पुन्हा काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होणार?" तसेच जिल्ह्यातील इतर शहरात अशी कारवाई केव्हा होणार? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

वाहतूक शाखेने मात्र रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी अशा धडक मोहिमा नियमितपणे राबविण्यात येतील,असा दावा केला आहे. आता या कारवाईचे सातत्य कायम राहते का,याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.

#Chandrapur Police. #Minor Driving Police Action. #Marathi News.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$