Chandrapur Polic : कायदा-सुव्यवस्थेसाठी चंद्रपूर पोलिसांचा विशेष उपक्रम;198 जामिनावरील आरोपींची ओळख परेड!|Marathi News.

News@Identification parade...

              Chandrapur : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दरोडा जबरी चोरी,घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून जामिनावर सुटलेल्या तब्बल 198 आरोपींची विशेष ओळख परेड(कवायत)घेण्यात आली.

या विशेष कवायतीदरम्यान सर्व आरोपींची पार्श्वभूमी तपासण्यात आली.न्यायालयाने जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या.अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात येईल,असा कडक इशाराही पोलिसांकडून देण्यात आला.

यावेळी ज्या जामीनप्राप्त आरोपींवर यापूर्वी कोणतीही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली नव्हती,अशा आरोपींची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधक कायदेशीर कारवाई करण्यात आली.भविष्यात त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे घडू नयेत,हा या कारवाई मागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर 24 तास बारकाईने लक्ष ठेवण्याचे तसेच ते पुन्हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होणार नाहीत,याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात शांतता,कायदा व सुव्यवस्था कायम राखणे,ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असून गंभीर गुन्ह्यांतील जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा ठाम संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

#Chandrapur District Crime News. #Identification parade. #Chandrapur police.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$