Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूरने घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठे यश मिळवत आंध्र प्रदेशातील एका सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक केली आहे.आरोपीकडून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 घरफोडी आणि 3 दुचाकी चोरीचे असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ₹4.65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
'बल्लारपूर घरफोडीच्या तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले.'
19 मे 2026 रोजी बल्लारपूर येथील गोरक्षण वॉर्डात राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ₹2.92 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली होती.या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंद्री)येथून त्याला ताब्यात घेतले.
'आरोपीची धक्कादायक गुन्हेगारी पार्श्वभूमी.'
अटक करण्यात आलेला आरोपी चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला (वय 32)हा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्यावर आंध्र प्रदेशात 41 आणि तेलंगणात 6,असे एकूण 47 घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
'अशी होती घरफोडीची पद्धत.'
पोलीस तपासात आरोपीची गुन्हा करण्याची पद्धतही समोर आली आहे.आरोपी रेल्वेने प्रवास करून रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरी करत असे.त्यानंतर चोरीची दुचाकी वापरून परिसरातील बंद घरे हेरून घरफोडी करत असे.चोरीनंतर दुचाकी पुन्हा रेल्वे स्थानकाजवळ सोडून रेल्वेने मूळ गावी परत जात असे. विशेष म्हणजे,तो रेल्वे प्रवास करताना तिकीटही बाळगत नसल्याचे तपासात उघड झाले आहे.
'9 गुन्ह्यांची उकल.'
आरोपीकडून बल्लारपूर,राजुरा,चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यांतील 6 घरफोडी आणि 3 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
'₹4.65 लाखांचा मुद्देमाल जप्त.'
पोलिसांनी आरोपीकडून 2 मोटारसायकली,एक मोपेड,चांदीचे दागिने,असा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच सुमारे ₹3.20 लाखांचे सोन्याचे दागिने आरोपीने राजमुंढरी येथील गोल्ड कंपनीमध्ये विकल्याचे निष्पन्न झाले असून ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹4.65 लाख इतकी आहे.
'तपास सुरू.'
अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून,त्याच्याकडून आणखी काही घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच आरोपीची ओळख पटविण्यासाठी तेलंगणा पोलिसांनीही मोलाची मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
#Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
