Korpana : तालुक्यातील नांदाफाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट समोर 30 मे रोजी सायंकाळी अंदाजे 7 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रज्जाक शेख वयवर्ष अंदाजे 70,हे गंभीर जखमी झाले.त्यांचे दोन्ही पाय व हाताला फ्रॅक्चर झाले आहे.एका पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला असून सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.संबंधित आयशर ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.मात्र,दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली,त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार,गडचांदूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक HH/34/BZ/7674,ने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेटसमोर रज्जाक शेख यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते गंभीर जखमी झाले.या प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
'अतिक्रमणामुळे वाढला अपघातांचा धोका?'
या अपघातानंतर नांदाफाटा बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांच्या मते,बाजारपेठेतील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.असे असताना मात्र,स्थानिक ग्रामपंचायत कडून अतिक्रमण हटविण्यासाठी किंवा बाजारपेठेचे योग्य नियोजन करण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे,3 महिन्यांपुर्वी याच परिसरात झालेल्या अपघातात संघपाल भगत,यांचा मृत्यू झाला होता.त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.चौकात वारंवार अपघात घडत असून भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती यानिमित्ताने स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
'आंदोलनानंतर उपचार खर्चाची जबाबदारी.'
अपघातानंतर नांदाफाटा,येथील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले.याची दखल घेत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीने जखमी रज्जाक शेखच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळत आहे.आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते शिवचंद्र काळे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर,पुरुषोत्तम निब्रड,अभय मुनोत,गणेश लोंढे,अन्सार शेख,चंदू राऊत,गौस सिद्दीकी,पंकज लिहीतकर इतरांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'नागरिकांची मागणी.'
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नांदाफाटा बाजारपेठेतील अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अपघातग्रस्त चौकात आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
#Accident News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
