Chandrapur : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे सुरू असून,शेतकरी कर्जमाफीसह विविध जनहिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा सुरू असताना संबंधित विभागांचे काही सचिव अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी सरकारला जाब विचारला.
"विधानसभेला काही महत्त्व आहे की नाही? प्रत्येक आमदार हा लाखो जनतेचे प्रतिनिधित्व करतो.मग काही सचिव सभागृहात उपस्थित राहतात,तर काही वारंवार अनुपस्थित का असतात? त्यांच्या पगारात काही फरक आहे का?" असा थेट सवाल करत मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रहार केला.
केवळ शासन निर्णय (GR)काढून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत,तर संबंधित विभागांच्या सचिवांनी सभागृहात उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत तालिका अध्यक्षांनी संबंधित सचिव व अधिकाऱ्यांना तात्काळ सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.या मुद्द्यामुळे अधिवेशनात प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
#Maharashtra Monsoon Session 2026.
#MLA Sudhir Mungantiwar.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
