Chandrapur : शहरातील मित्रनगर चौकात एका 48 वर्षीय इसमाच्या निर्घृण हत्ये प्रकरणी रामनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली. तांत्रिक तपास,विशेष पथकाची मदत आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अजय उर्फ ॲप्पल पोहनकर (वय 19) याला ताब्यात घेतले.मृतकाचे नाव संतोष भेंडे (वय 48,रा.पाला, जि.अमरावती),असे असून,ही घटना 25 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मित्रनगर चौक परिसरात घडली.
प्राथमिक माहितीनुसार,संतोष भेंडे हे रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपी अजय पोहनकर याच्याशी त्यांचा वाद झाला.हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.त्यानंतर आरोपीने संतोष यांच्यावर हाता-बुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली.या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.हा गुन्हा कौटुंबिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली.
घटनास्थळी अंधार असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.तरीही पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि विशेष शोध पथकाच्या मदतीने आरोपीची ओळख निश्चित केली.आरोपी वडगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली.या पथकात सपोनि.शिवाजी नागवे,सपोनि.हनुमान उगले,पोउपनि. कृष्णा दराडे,आनंद खरात,शरद कुडे,जितेंद्र आकरे,राम नैताम, बाबा नैताम,पंकज,प्रकाश मडावी,संदीप गेडाम,प्रफुल पप्पूलवार, सुरेश कोरवार,मनीषा मोरे आणि ब्ल्यूटी साखरे यांचा सहभाग होता.
#Chandrapur Crime.#Murder Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
