Cattle Smuggling : पायदळ अवैध गो-तस्करीवर कोरपना पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी नेले जाणारे 5 गोवंशीय जनावरे वाचवून, एकाला अटक!|Marathi News.

News@Crime...

 Korpana : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात गो-तस्करांकडून वापरल्या जाणाऱ्या नव्या क्लृप्त्यांना कोरपना पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे.वाहनांऐवजी पायदळ मार्गाने कत्तलीसाठी तेलंगणात नेली जात असलेली 5 गोवंशीय जनावरे(अंदाजे किंमत ₹ 75 हजार)जप्त करून त्यांची सुटका करण्यात आली.या प्रकरणी जिवती तालुक्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून,ही कारवाई 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,मौजा सावलहिरा ते येलापूर मार्गे तेलंगणातील मेंढीगुडा येथे एक व्यक्ती गोवंशीय जनावरे दोरीने बांधून पायदळ कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.माहितीची खातरजमा होताच कोरपना पोलिसांनी पंचांसह सावलहिरा-येलापूर घाट परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली.

दरम्यान,5 बैलांना दोरीने बांधून पायी नेत असलेला एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आला.चौकशीदरम्यान त्याच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीची अधिकृत पावती अथवा वाहतुकी साठी आवश्यक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.पुढील तपासात ₹ 45 हजार किमतीचे तीन पांढऱ्या रंगाचे बैल आणि ₹ 30 हजार किमतीचे दोन धामण्या रंगाचे बैल,अशी एकूण ₹ 75 हजार किमतीची गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी लक्ष्मण कोडापे (वय 40,रा. गुडशेला,ता. जिवती,जि.चंद्रपूर),याच्याविरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

   सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात, कोरपना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार काश्यप वाळके व विशाल मोरे यांनी केली.पुढील तपास नायब पोलीस अंमलदार रामदास आडे करीत आहेत.

   महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगतच्या कोरपना परिसरात वाहनांद्वारे होणाऱ्या गो-तस्करीवर पोलिसांनी सातत्याने कारवाई केल्यामुळे तस्करांनी आता जंगल व घाटमार्गाचा वापर करून पायदळ गोवंशीय जनावरे नेण्याचा मार्ग अवलंबल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.पोलिसांनी अशा नव्या पद्धतींवरही प्रभावी अंकुश ठेवत तस्करांचे मनसुबे उधळून लावले आहेत,हे मात्र विशेष.

#Chandrapur District Crime News #Korpana Cattle Smuggling Case.

         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$