Chandrapur : जिल्ह्यातील मोहर्ली,पद्मापूर मार्गावर 15 मार्च 2026 रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे.याठिकाणी काही अतिउत्साही नागरिकांनी वाहने थांबवून चक्क वाघाचा रस्ता अडवल्याचे समोर आले आहे.वाघाचा पाठलाग करत व्हिडिओ काढल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच वनविभाग खळबळून जागा झाला.याची गंभीर दखल घेण्यात आली असून सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करून संबंधितांचा शोध सुरू करण्यात आला आहेत.
प्राप्त माहितीनुसार मोहर्ली,पद्मापूर रस्त्यावर काही नागरिकांनी आपली वाहने थांबवून वाघाचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जणांनी रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा मार्ग अडवत,त्याचा पाठलाग करत व्हिडिओ शुट केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार,वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबवून वन्यजीवांच्या हालचालीत अडथळा निर्माण करणे,हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे या घटनेत सहभागी असलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते. तसेच रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तींविरोधात वनगुन्हा क्रमांक 09654/211333, दि.15 मार्च 2026 रोजी भारतीय वन अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.व्हिडिओ मधील व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहेत.
दरम्यान,व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबाबत कोणाकडेही माहिती असल्यास 9834689541 या नंबरवर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटना अत्यंत धोकादायक व गंभीर असल्याचे सांगत वनविभागाने नागरिकांना वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण न करण्याचे आणि वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#Shocking News.#Chandrapur Tiger News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
