Korpana : तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथे शिवसाम्राज्य युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रयतेचे राजे,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. भव्यदिव्य पालखी,शिवकालीन गीतांवर नृत्य,वेशभूषा, रांगोळी स्पर्धा,अशा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.संभाजीनगर येथील शिवशाही विजयानंद दादा काटे,यांच्या संचाने सादर केलेला पोवाडा ऐकुन उपस्थित अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.छत्रपती महाराजांचा स्वराज्याचा आदर्श,स्त्री सन्मान,शेतकऱ्यांप्रती प्रेम,अशा अनेक ऐतिहासिक बाबी पोवाड्यातून त्यांनी मांडल्या.
मिरवणुकीदरम्यान "छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी,जय शिवाजी,तुमचं आमचा नाता काय,जय जिजाऊ,जय शिवराय" अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेतील मावळे,महिला मंडळ भजन ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रांगोळीच्या मनमोहक चित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.एकुणच नांदा नगरी शिवमय' झाल्याचे पाहायला मिळाले.सदर जयंती सोहळ्यात तरूणांपासून वयोवृद्धापर्यंत शिवभक्त नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती तर बालगोपालांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदा येथील शिवसाम्राज्य युवक मंडळ व शिवप्रेमींनी आणि विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
#Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
