Chandrapur : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे.उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी,यांनी दोघांनाही 6 महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले असून पोलिसांनी संबंधित आदेशांची अंमलबजावणी केली आहे.
'या दोघांवर तडीपारीची कारवाई' :
तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अशफाक मस्तान कुरेशी(वय 43),रा.गोंडपिपरी,ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर आणि सुंदरसिंग ऊर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी(वय 23)रा. जोगापूर ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर,यांचा समावेश आहे.
दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम,1951च्या कलम 56 (अ) व (ब)अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव गोंडपिपरी पोलिसांकडून उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांच्याकडे सादर करण्यात आले होते.या प्रस्तावांवर कार्यवाही करत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोघांनाही 6 महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले.त्यानुसार गोंडपिपरी पोलिसांनी आदेश बजावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
'गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा इशारा' :
परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि समाजविघातक कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा गोंडपिपरी पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षा आणि परिसरातील शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
'वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई' :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
#Chandrapur District Crime News. #Gondpipri Police Action.

