Gadchandur Crime : गडचांदूरमध्ये जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट; राजकीय नेत्यांच्या सहभागाची चर्चा!| Marathi News.

News@Crime...

        Korpana : तालुक्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथित अवैध जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.शहरातील विविध राजकीय पक्षांशी संबंधित काही नेते या अवैध व्यवसायाशी जोडले गेले असल्याचीही चर्चा असून,जनतेचे सेवक म्हणून ओळख प्राप्त नेत्यांच्या या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,गडचांदूर शहरात तसेच ग्रामीण भागातही सुमारे 5 ते 6 ठिकाणी कथितरीत्या जुगार सुरू असल्याची चर्चा आहे.या प्रकारांमुळे तरुण पिढीवर होणारे संभाव्य दुष्परिणाम आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

'या ठिकाणांची परिसरात चर्चा' :

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार,गडचांदूर परिसरातील पुढील ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

० रावी पेट्रोल पंपाजवळ,महामार्गालगत एका खोलीत.

० कोरपना रोडवरील एका हॉटेलच्या इमारतीत.

० रेल्वे स्टेशन रोड परिसरातील एका धाब्यावर.

० घोडामगुडा रोडलगत शेतातील एका शेडमध्ये.

० कृषी उत्पन्न बाजार समिती रोड परिसरात.

या ठिकाणांबाबतच्या माहितीची पोलिसांकडून प्रत्यक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे.संबंधित ठिकाणी अवैध जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यास थातूरमातूर कारवाई करून तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार बाजुला सारून नियमानुसार ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.

'जुगार अड्ड्यांची माहिती नवीन ठाणेदारांपर्यंत पोहोचतेय की नाही? जुन्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर चर्चा' :

गडचांदूर शहरात विविध ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे.ठाणेदार नव्याने रुजू झाले असले,तरी शहरातील जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणांची माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मग या अड्ड्यांबाबतची माहिती नवनियुक्त ठाणेदारांपर्यंत पोहोचवली जात आहे का? की त्यांना अंधारात ठेवले जात आहे,असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारलेले नवनियुक्त ठाणेदार प्रमोद बानबले यांच्यासमोर या कथित अवैध जुगार अड्ड्यांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील कथित जुगार अड्ड्यांबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

'नागरिकांची कठोर कारवाईची मागणी' :

अवैध जुगारामुळे आर्थिक नुकसान,कौटुंबिक समस्या आणि गुन्हेगारीला चालना मिळण्याची शक्यता लक्षात घेता,पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी,संबंधित ठिकाणांची पडताळणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आता नवनियुक्त ठाणेदार प्रमोद बानबले या कथित जुगार अड्ड्यांविरोधात कोणती भूमिका घेतात आणि प्रत्यक्ष कारवाईतून अवैध धंद्यांना कितपत आळा घालतात,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#Gadchandur Crime News. #Gambling.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢