Shocking incident : बिबट्याच्या जबड्यातून 9 वर्षीय बालकाची थरारक सुटका; टाळी वाजवून वेधले नागरिकांचे लक्ष!|Marathi News.

News@Leopard attack...

   Ballarpur : माता महाकालीच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसोबत पायदळ निघालेल्या एका 9 वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला उचलून नेल्याची थरारक घटना विसापूर टोलनाक्याजवळ शनिवारी,17 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या कार्तिक संजय जाधव या बालकाने प्रसंगावधान राखत टाळी वाजवून नागरिकांचे लक्ष वेधले.त्यानंतर नागरिकांनी शोध घेत त्याला झुडपातून जखमी अवस्थेत बाहेर काढले.या घटनेत कार्तिकच्या गळ्याला व मानेला गंभीर दुखापत झाली असून,त्याच्यावर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'नेमकं काय घडलं ?' :

नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक चंद्रपुरात येत आहेत. हैदराबाद येथून बल्लारपूरमधील आपल्या आत्याकडे आलेला 9 वर्षीय कार्तिक संजय जाधव हा 17 ऑक्टोबर रोजी रात्री आत्यासह इतर कुटुंबीयांसोबत बल्लारपूरहून पायदळ चंद्रपूरकडे निघाला होता.रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास हे कुटुंब विसापूर टोलनाक्याजवळ पोहोचले असता,दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कार्तिकवर हल्ला केला.बिबट्याने त्याला जबड्यात पकडून उचलून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

'नागरिकांकडून शोधमोहीम' :

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.बिबट्याने बालकाला उचलून नेल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा करत त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.नागरिक व प्रशासनाकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधारामुळे सुरुवातीला कार्तिकचा शोध लागला नाही.

'टाळीच्या आवाजाने मिळाले जीवदान' :

घटनेनंतर सुमारे एक ते दोन तासांनी घटनास्थळापासून काही अंतरावरील दाट झुडपातून टाळी वाजविल्याचा आवाज नागरिकांना ऐकू आला.आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, कार्तिक रक्तबंबाळ अवस्थेत झुडपात पडलेला आढळला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या गळ्याला आणि मानेला गंभीर जखमा झाल्याने त्याला मोठ्याने ओरडणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीतही त्याने टाळी वाजवून मदतीसाठी नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.त्याच्या या प्रसंगावधानामुळे त्याचा शोध लागण्यास मदत झाली.

'जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू' :

कार्तिकला नागरिकांनी तातडीने झुडपातून बाहेर काढून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.मृत्यूच्या छायेतून बचावलेल्या या बालकाच्या धैर्याची परिसरात चर्चा होत आहे.

दरम्यान,या घटनेमुळे विसापूर आणि बल्लारपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात बिबट्याचा वावर रोखण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#Ballarpur Shocking News. #Leopard attack.

                   ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢