Korpana : शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली ₹5,000 ची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने भाजपा सरकारविरोधात निषेध नोंदविला.पीकनुकसान,वाढता उत्पादन खर्च,कर्जबाजारीपणा आणि पाणीटंचाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 1 लाखाची मदत देण्यात यावी,या प्रमुख मागणीसह मुख्यमंत्री यांच्या नावे ₹5,000 चा धनादेश आणि विविध मागण्यांचे निवेदन सोमवार,19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता कोरपना तहसील कार्यालया मार्फत पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असताना केवळ ₹ 5,000 ची अग्रिम मदत जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका संघटनेने केली.नैसर्गिक संकटे,पिकांचे नुकसान,वाढता शेतीचा खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी अडचणीत असताना शासनाने ठोस आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले.
'शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या' :
• किसान योजनेचे प्रलंबित दोन हप्ते त्वरित वितरित करावेत.
• शेतकऱ्यांचे वीज व पाणी कनेक्शन खंडित करू नयेत.
• जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
• महसुली जमिनीवर 30 वर्षांपेक्षा अधिक काळ शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचे पट्टे द्यावेत.
• स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य द्यावे.
• कंत्राटदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत.
'15 दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन' :
शासनाने निवेदन प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत मागण्यांवर ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा.अन्यथा दिवाळी पूर्वी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या मदतीऐवजी झालेल्या नुकसानीची भरपाई आणि सन्मानाने जगण्यासाठी भक्कम आर्थिक आधार मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
'ॲड.वामनराव चटप,यांच्या मार्गदर्शनात आंदोलन' :
राजुरा विधानसभेचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड.दीपक चटप, जिल्हाध्यक्ष अरुण पा.नवले,स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठराव कोरांगे,ज्येष्ठ नेते रमाकांत मालेकर,तालुकाध्यक्ष श्रीनिवास मुसळे युवा आघाडी अध्यक्ष नरेश सातपुते,आशिष मुसळे,गणपत काळे, सरपंच विजय धानोरकर,बंडू राजूरकर, जगन्नाथ पिदुरकर,शारीक सैय्यद,गणेश तुराणकर, सुनील आमने,विकास देवाळकर,मंगेश आगलावे,कैलास कोरांगे आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती.
#Shetkari Sanghatna #Korpana #Chandrapur.

