Chandrapur : कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली.25 ऑक्टोबर रोजी मौजा लोनवाही येथील ईदगाहजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत रोशन करकाडे 23 वर्ष,रा.गुरुदेव चौक,सिंदेवाही याला पकडण्यात आले.तर पोलिसांची चाहूल लागताच 5 आरोपी फरार झाले.
घटनास्थळावरून दोन कोंबडे,400 रुपये रोख आणि 5 मोटार सायकली असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी रोशन करकाडे याच्यासह 5 मोटारसायकलींच्या चालकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ)अन्वये गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली.
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस पथक जुगारविरोधी कारवाई व गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की,लोनवाही येथील ईदगाहजवळ काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावत आहेत.माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.यावेळी पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.मात्र,पोलिसांनी पाठलाग करून रोशन करकाडेला पकडले.घटनास्थळाची पाहणी केली असता 2 लाल रंगाचे कोंबडे,400 रुपये रोख आणि 3 हिरो स्प्लेंडर पल्स,1 हिरो ग्लॅमर व 1 हिरो पॅशन एक्स प्रो,अशा 5 मोटारसायकली आढळून आल्या.पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे उपविभागिय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाहीचे ठाणेदार लता वाढीवे यांचा नेतृत्वात सपोनि.सतीश मेश्राम, पोहवा संजय जुमानके,पोअं.नंदकिशोर,आफताब आणि शुभम यांनी केले.पुढील तपास सुरू आहे.
#Chandrapur District Crime News.

