Chandrapur Crime : LCB चा गांजा तस्करीवर प्रहार; 2.72 लाखांचा मुद्देमाल जप्त.एकाला अटक.| Marathi News.

News@Crime...

      Chandrapur : युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत.याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बल्लारपूर येथील वेलकम बल्लारशा गेटजवळ सापळा रचून गांजा तस्करीच्या संशयावरून एका इसमाला अटक केली.या कारवाईत ५.०३३ किलोग्रॅम गांजा,मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर उपविभागीय पथकाला गुप्त माहिती मिळाली की,राजुरा येथून बामणी मार्गे एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीच्या उद्देशाने चंद्रपूरच्या दिशेने घेऊन येत आहे.या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार LCB पथकाने बल्लारपूर येथील वेलकम गेटजवळ नाकाबंदी करून सापळा रचला.

मिळालेल्या वर्णनानुसार पाठीवर ग्रे रंगाची बॅग घेऊन बल्लारपूरच्या दिशेने चालत येणाऱ्या संशयित इसमाला पथकाने ताब्यात घेतले.पंचांसमक्ष त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये तपकिरी रंगाच्या पॅकिंग टेपने गुंडाळलेले एक पार्सल आढळून आले.हे पार्सल उघडून तपासले असता,त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचे नाव राज तोताराम कोरडे असे असून,तो मूळचा अडपल्ली चेक,ता.मुलचेरा,जि.गडचिरोली येथील रहिवासी आहे. सध्या तो इंदिरानगर,चंद्रपूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्याच्याकडून ५.०३३ किलोग्रॅम सुका गांजा, एक मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २,७२,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गांजा तस्करीचे ओडिशा कनेक्शन :

प्राथमिक तपासात आरोपीने आर्थिक फायद्यासाठी ओडिशा राज्यातून अवैध मार्गाने गांजा आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाचे आंतरराज्यीय धागेदोरे कोणते आहेत,याचा तपास पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस अंमलदार सतीश अवथरे,लालू यादव,इम्रान खान,संदीप कांबळे,हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांच्यासह सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कार्तिक खनके व महिला पोलीस अंमलदार अंजनी घिवे यांचा समावेश होता.

#Chandrapur Crime News. #Action by LCB Chandrapur.

                ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢