Korpana : तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर,येथे गणेशमूर्तींच्या विसर्जनाची लगबग सुरू असताना,आज होणाऱ्या विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे गणेशभक्तांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेषतः पेट्रोल पंप चौक ते वीर बाबूराव शेडमाके चौक(दोन्हीकडील रस्ता),या मुख्य मार्गासह शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात आज मोठ्या संख्येने गणेशभक्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.या मिरवणुकीत महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्याप्रमाणात सहभाग असतो.अशा परिस्थितीत विसर्जन मार्गावरील खड्डे अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता असून,विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरू शकतात?
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था,बंदोबस्त तसेच इतर आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात असताना,विसर्जन मार्गावरील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो भक्त रस्त्यावर उतरणार असल्याने,संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन विसर्जन मार्गावरील धोकादायक खड्डे बुजवावेत,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना गणेशभक्तांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची आहे.त्यामुळे प्रशासनाने आजच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
#Gadchandur Ganesh Visarjan News. #Ganpati Bappa Morya.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
