Gadchandur Crime : पेट्रोल पंपावरील चोरीचा छडा; नागपूरच्या कळमन्यातून २० वर्षीय आरोपी ताब्यात!|Marathi News.

News@Crime...

   Korpana : तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील पेट्रोल पंपावर मध्यरात्री झालेल्या चोरीचा गडचांदूर पोलिसांनी छडा लावला आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयित आरोपीला नागपूर जिल्ह्यातील कळमना येथून ताब्यात घेतले.दादाजी उर्फ नागेश सुनील मडावी (वय २०, रा.वॉर्ड क्रमांक ४,गडचांदूर),असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असताना चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला.त्यानंतर कॅबिनमधील ड्रॉवरमधून तब्बल १ लाख २ हजार रुपये लंपास केले होते.या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस पथक आरोपीच्या मागावर असताना २८ ऑगस्ट रोजी कळमना,जिल्हा नागपूर येथून आरोपी दादाजी उर्फ नागेश मडावी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या रकमेतून जुना वापरता Apple कंपनीचा १ मोबाईल,अंदाजे किंमत २५ हजार रुपये,जप्त केला आहे.चोरीस गेलेल्या उर्वरित रकमेसंदर्भात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

  सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव गडचांदूर,यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात मपोहवा.शितल बोरकर,पोलीस अंमलदार मनोहर जाधव,सूरज ढोले आणि NPC बलवंत शर्मा यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#Chandrapur District Crime News.#Gadchandur Police.

                      ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢