Chandrapur : जिल्ह्यात डीजे वाजविण्यावर बंदीचे आदेश असतानाही ठिकठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून विनापरवाना तसेच कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यां विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे.याच मोहीमेअंतर्गत दुर्गापूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 123.05 डेसिबल आवाजाची नोंद झालेल्या डीजेवर कारवाई केली.या कारवाईत वाहनासह सुमारे 13.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंगवर असताना कोंडी वार्ड क्रमांक 6,ऊर्जानगर,नेरी येथे गणेश आगमन मिरवणुकीत अत्यंत तीव्र आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शेगावकर यांनी संबंधित डीजेची ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता,आवाजाची तीव्रता 105.5 डेसिबल असल्याचे आढळून आले.यावेळी संबंधितास पंचांसमक्ष आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मात्र,त्यानंतरही संबंधित इसमाकडून पुन्हा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार भोयर आणि पोलीस शिपाई हरीश तलांडे हे ध्वनीमापक यंत्र व पंचांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी डीजेचा आवाज क्षमतेपेक्षा अधिक कर्णकर्कश असल्याचे निदर्शनास आले.
पंचांसमक्ष ध्वनीमापक यंत्राद्वारे पुन्हा तपासणी केली असता आवाजाची तीव्रता तब्बल 123.05 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली.पोलिसांनी डीजे वाजविण्याचा परवाना मागितला असता संबंधिताने आपल्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 38 अन्वये आदेश जारी केलेले असतानाही त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून डीजेचे साहित्य व वाहन ताब्यात घेतले.
या प्रकरणातील डीजे चालक अमन गंगाधर गोहणे (रा.बाबराळा, ता.मुल,जि.चंद्रपूर),याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 136 व 70 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेले डीजे साहित्य :
शॉर्प ऑडिओ ॲम्प्लिफायर (MT 1201) – किंमत 1 लाख रुपये.
2 टॉप स्पीकर – किंमत 4.50 लाख रुपये.
डायनाटेक कंपनीचा डीजे मिक्सर – किंमत 1 लाख रुपये.
15 KVA जनरेटर व 2 पार्क लाईटसह इतर साहित्य - किं.1 लाख.
एख महिंद्रा वाहन – अंदाजे किंमत 6 लाख रुपये.
वाहन व डीजे साहित्याची एकूण किंमत – सुमारे 13.50 लाख रुपये.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेगावकर,पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे,पोलीस हवालदार भोयर आणि पोलीस शिपाई तलांडे यांनी केली.
विनापरवाना डीजे वाजविणाऱ्यांना पोलिसांचा इशारा :
सार्वजनिक शांतता भंग होईल अशा पद्धतीने तसेच विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल,असा,इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
#DJ Dolby Ban #Action by Chandrapur Police.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
